Wednesday, July 6, 2016

संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प अंतर्गत विक्री केंद्राचे उद्घाटन

आंतरराष्ट्रीय कृषि विकास निधी सहाय्यित, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमा अंतर्गत श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र चामोर्शी द्वारे तळोधी ता.चामोर्शी येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प अंतर्गत जैविक खत विक्री केंद्राचे उद्घाटन तथा श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र चामोर्शीची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली.

याप्रसंगी .घोलप कृषी सहसंचालक पुणे, मा.बनसोडे कृषी सहसंचालक नागपूर विभाग, अनंत पोटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कृषी विभाग गडचिरोली, संचालक आत्मा गडचिरोली, मा. कांता मिश्रा वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली, माधुरी सुरजागडे सरपंच ग्राम पंचायत तळोधी,किशोर मानधाडे उपसरपंच ग्राम पंचायत तळोधी, गीता वैरागडे अध्यक्ष श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र चामोर्शी आदी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी उद्घाटक म्हणून खासदार अशोक नेते म्हणाले की, श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्राने बचत गटातील शेतकरी महिलांकरिता राबविलेला संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प हा स्तुत्य उपक्रम आहे. यामधून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकरीता शेतकरी महिलांना भरघोस उत्पादन मिळेल व बचत गटातील महिलांना रोजगार प्राप्त होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल असे प्रतिपादन त्यांनी केले .

पुढे ते असेही म्हणाले की, बचत गटातील महिलांद्वारे उत्पादित संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्पाच्या शेड बांधकामाकरिता खासदार निधीमधून ५ लाख रुपये निधी देण्याचे सुतोवाच त्यांनी केले .

याप्रसंगी कांता मिश्रा वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली,
यांनी आपल्या प्रास्ताविक करतांना श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र चामोर्शी यांची कार्य करण्याची दिशा स्पष्ट केली तथा संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प हा स्तुत्य उपक्रम बचत गटातील महिलांना नियमितरीत्या रोजगार देणारा प्रकल्प असून यामधून ग्राम स्वचछता होऊन लोकांचे आरोग्य सुद्रुढ राहण्यास मदतच होईल . याकरिता महिलांना सदर कार्य मोठा जोमाने करण्याकरिता शेडची अत्यंत आवश्यकता आहे. व त्यामध्ये महिलांना सदर प्रकल्प पुढे नेण्यास गती प्राप्त होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले . त्या पुढे असेही म्हणाल्या की, सदर प्रकल्पाकरीता स्वच्छता करण्याचा उद्देश समोर ठेऊन गावातील कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व त्यातून नियमितरीत्या बचत गटातील महिलांना रोजगार निर्मिती व उत्पन्न मिळविण्याचे साधन म्हणून पहिले जाईल . जोपर्यंत स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या प्रश्नाकडे शाश्वतता उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन निर्माण होईल तेव्हाच स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सारखे प्रश्न सोडविण्याच्या प्रक्रियेला गती व शास्वतता निर्माण होईल. आवश्यकता आहे ती आपला दृष्टीकोन बदलविण्याची व गावातील सहकार्याची .

याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सदर कार्यक्रमाचे वेळी श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्राच्या सचिव इंदिरा गौरकार यांनी ऑडीट रिपोर्ट चे वाचन केले. तर पौर्णिमा खोबरागडे यांनी चालू वर्षाचा शाश्वत नियोजन आराखडा प्रस्तुत केला . कार्यक्रमाचे संचालन मोहन घनोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रमसाफल्य शेतकरी संघ चामोर्शी च्या उपाध्यक्ष इंदिरा दहेलकर यांनी केले .

सदर कार्यक्रमाकरिता चामोर्शी तालुक्यातील बचत गटातील ३०० महिला सदस्य तथा श्रमसाफल्य शेतकरी संघ चामोर्शी च्या सदस्य, संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व उत्पादित गट तलोधीच्या सदस्य, खत निर्मिती प्रकल्पाच्या सदस्य आणि ला सक्षमीकरण समिती तळोधी येथील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्रविण गड्पायले, चारुदत्त वाढई, विक्रम त्रिपदे, पौर्णिमा खोब्रागडे, दर्शना रामटेके, भारती नांद्गावे, यशोदा मामीडवार यांनी प्रयत्न केले.


Tuesday, July 5, 2016

जीवनशैलीतच असावी जलजागृती



आपण सारे ज्याची आतूरतेने वाट बघतो असा ऋतू म्हणजे पावसाळा होय. मौसमी हवामानाच्या क्षेत्रात आपला देश आहे. आजही देशातला प्रमुख व्यवसाय शेती आणि शेती आधारित उद्योग असा आहे. आसेतूहिमाचल अशा आपल्या या खंडप्राय देशात भौगोलिक रचनेमुळे सर्वत्र सिंचन सुविधा नाही त्यामुळे पडणारा पाऊस सर्वांसाठी महत्वाचा असतो.
महाराष्ट्रात अनेक भागात चांगला पाऊस होत असला तरी मराठवाडा आणि लगतच्या पश्चिम महराष्ट्राचा भाग हा पर्जन्य छायेच्या क्षेत्रात येतो यामुळे येथे पडणा-या पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यात गेल्या ३-४ वर्षात सातत्याने घट दिसून आली आहे.

नागरिकरणाचा वाढता जोर आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता सर्वाधिक प्राधान्य पेयजलासाठी देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही अशा स्थितीत निर्माण झालेल्या सिंचन सुविधांचा वापर देखील पेयजलासाठी करण्याची वेळ आली आहे.भूजलाचा मोठया प्रमाणावर होत असलेला उपसा आणि कमी होत गेलेला पाऊस यामुळे पहिली धोक्याची घंटा लातूरमध्ये वाजली. पिण्यास पाणीच नाही अशा परिस्थितीमुळे येथे रेल्वेव्दारे पाणी आणून पाणीपुरवठा करावा लागला. परिस्थितीने निर्माण केलेल्या या आव्हानाचा मुकाबला शासनाने अतिशय चांगल्या पध्दतीने केला आणि लातूरकरांना पाणी उपलब्ध झाले.असाच काहीसा प्रकार काही वर्षापूर्वी मध्य प्रदेश राज्यातील देवास मध्ये घडला मात्र लोकांनी आपली जबाबादारी मानत पाणी कमावण्याचा निर्धार केला आणि तेथील चित्र अमुलाग्र बदलले. हीच प्रतिक्रिया आपल्या राज्यातही अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारणा-या जलयुक्त शिवार उपक्रमासोबतच मागेल त्याला शेततळे सारख्या उपक्रमांना प्रतिसाद मिळत आहे ही निश्चितपणे चांगली बाब आहे. या निमित्ताने जलजागृती राज्यात सुरू झाली आहे.

आलेला बदल निश्चितच चांगला आहे मात्र त्याही पलिकडे जाऊन येणा-या काळात काम अपेक्षित आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पाऊस पडून सारं आबादानी होईल असं आशादायी चित्र सध्या सर्वत्र आहे. अशा स्थितीत पुन्हा पाण्याचा अमर्याद वापर सुरू होण्याचा धोका आहे. तो टाळणे ही आजची काळाची गरज आहे.आपण वर्षानुवर्षे जमिनीतून पाण्याचा उपसा करून शेती पिकवली आता त्या धरतीचं ते दान परत देण्याची वेळ आली आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब कसा जिरवता येईल यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने विचार आणि कृती करण्याची गरज आहे.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तयार झालेल्या शेततळयांनी काही प्रमाणात सुक्ष्म सिंचन क्षमता प्रत्येक शेतक-याला निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शहरांमधून राहणा-या जनतेनेही यात आपला वाटा उचलण्याची गरज आहे.

पावसाचं करोडो लिटर पायी वाहून जाताना आपण शहरात बघतो. हा प्रकार आपण कसा रोखता येईल याचा विचार व्हायला पाहिजे.निसर्ग आपणास जे मुक्तहस्ते देत आहे त्याचा वापर आपण योग्य पध्दतीने केला तर येणा-या काळात आपलंच जगणं सुकर होणार आहे. येणा-या पिढीला आपण निसर्गासोबत कसं जगता येईल याचा वस्तूपार घालून देण्याची गरज आहे.'रेन वॉटर हार्वेस्टींग' च्या रूपाने निसर्गाचं हे पावसाचं दान धरतीला परत करणा-या इमारती बांधल्या जात आहे मात्र लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र यांच्या तुलनेत अशा इमारतींचे प्रमाण नगण्य म्हणावे लागेल. छतावर सोलार उपकरणांची मांडणी करून आपण शहरी भागात वीज कमावू शकतो. याच छतावर पडणारं पावसाचं पाणी बेसमेंटमध्ये साठवून वापरण्यासोबतच उर्वरित पाणी आपण बोअरच्या माध्यमातून थेट जमिनीत फेरभरणासाठी देऊ शकतो. धुणी-भांडी करताना वाया जाणारं पाणी शोषखड्डयाच्या माध्यमातून आपण जमिनीत जाईल अशी व्यवस्था करू शकतो त्यामुळे भूजल साठयात वाढच होणार आहे.

निसर्गाच्या जवळ असणे यासाठीच आवश्यक ठरते. यापूर्वीच्या काळात मोटर द्वारे शेतीला पाणी देण्याची पध्दत होती आता वीज आली आणि वीज नसेल तरी डिझेल पंपाच्या माध्यमातून आपण उपसा करतो. यात पाणी अमर्यादपणे उपसले जात आहे. हेच पाणी आपण जुन्या पध्दतीप्रमाणे किंवा नव्या तंत्राने अर्थात ठिबक सिंचनाच्या रुपात शेतीला दिले तर उपशाचे हे प्रमाण ६० ते ७० टक्के इतके कमी होवू शकते.पाण्याचा योग्य विनियोग आपण करायचं ठरवलं तर खरीप आणि रब्बी सोबत उन्हाळी हंगामात देखील आपण पिक घेऊ शकतो. आता आलेली ही जलजागृती हा आपण जीवनशैलीचा भाग बनवल्यास येणा-या काळात जलसंकट येणार नाही आणि शेतकरी देखील संपन्न होईल ही खात्री आहे.
-प्रशांत अनंतराव दैठणकर 
9823199466

Friday, July 1, 2016

पुढील पिढीच्या भवितव्यासाठी 2 कोटी वृक्ष लागवड- खासदार अशोक नेते

गडचिरोली दि. 01: राज्यात सुरु असलेल्या 2 कोटी वृक्ष लागवड उपक्रम आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आहे. याला आता एक सामाजिक चळवळीचे स्वरुप आल्याचे बघून आनंद वाटला. असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी आज येथे केले .

विविध शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिक यांनी गडचिरोली जिल्ह्यात आपआपल्या कार्यक्रमाव्दारे वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. याचा मुख्य सोहळा येथील चामोर्शी रोडवरील सेमाना वनसंकुलात झाला त्यावेळी नेते बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार ड़़ॉ. देवराव होळी तसेच जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य वन संरक्षक कल्याणकुमार, पोलीस अधिक्षक अभिवन देशमुख, वनसंरक्षक लक्ष्मी अनबतुल्ला तसेच अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यास 5 लाख 98 हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट प्राप्त होते. मात्र 7 लाखाहून अधिक झाडे लावण्याचे नियोजन सर्वांनी केले होते. शहरात सकाळी नगरपालीकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची एक रॅली काढून वृक्षारोपणाचे आवाहन करण्यात आले. गडचिरोलीकरांनी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनीही यात आपला सहभाग नोंदविला.

याठिकाणी खासदार आणि आमदार यांच्यासह सर्व शासकीय अधिका-यांनीही वृक्षारोपणात सहभाग घेतला. यावेळी अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ तसेच पतंजली योग समितीचे पदाधिकारी
आणि कार्यकर्ते देखील यात सहभागी झाले.

जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या हस्ते  सकाळी  प्रथम खुले कारागृह परिसरात तसेच मुख्य कार्यक्रमानंतर  नगर पालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले.

आजच्या या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड सहायक जिल्हाधिकारी काैस्तूभ दिवेगांवकर. उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) जयंत पिंपळगावकर तसेच  निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांचाही सहभाग होता. आज शहराच्या विविध भागात तसेच जिल्हाभरात याच प्रकारे वृक्षारोपणाचे कार्यक्रम झाले.

वृक्षारोपण करताना पतंजली योग समितीचे कार्यकर्ते

तयारी वृक्षरोपणाची 1

तयारी वृक्षरोपणाची  2

तयारी वृक्षरोपणाची  3

तयारी वृक्षरोपणाची  4

 वृक्षलागवड शपथ घेताना अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर तसेच सहायक जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर आणि तुरूंग अधीक्षक ढोले

 वृक्षलागवड शपथ घेताना महाविद्यालय आणि शाळकरी मुले